यवतमाळ : कर्मचाऱ्यांची वानवा, साहित्याचा तुटवडा आदी कारणांमुळे राज्यातील सहा विभागांमध्ये शेती, प्लॉट, घराच्या एक लाख सात हजार ८०० मोजण्या रखडल्या आहेत. विशेष म्हणजे, अर्ज दाखल झाल्यानंतर महिनाभरात करावयाच्या अतितातडीच्या मोजण्याही लांबणीवर पडत आहेत. सर्वाधिक मोजण्या पुणे विभागात प्रलंबित असून सर्वात कमी औरंगाबाद विभागात आहेत.
भूमी अभिलेख विभागात सर्वेअरची ४,५०० पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २,५०० जणांवर काम भागवले जात आहे. दीर्घ काळापासून १,५०० जागा रिक्त आहेत. अलीकडे ५००हून अधिक सर्वेअरच्या पदोन्नत्या झाल्या. कर्मचारी तुटवड्याचा परिणाम मोजणीच्या कामावर झाला आहे. साधारणत: नोव्हेंबरपासून मोजणीच्या कामाला गती दिली जाते. परंतु, या काळात ड्रोन सर्वेक्षणाची कामे हाती घेण्यात आली. बहुतांश यंत्रणा ड्रोन सर्वेक्षणासाठी वापरण्यात आली. त्यामुळे या काळात मोजण्या रखडल्या.
मोजणीच्या साहित्याचाही तुटवडा आहे. गरजेइतकीच प्लेन टेबल, सर्वेअरच्या प्रमाणात इटीएस मशीन नाहीत. परिणामी या विभागात साधारण मोजणीचे अर्ज तर अमर्याद कालावधीसाठी पडून राहात आहेत.
१,२०० पदांची भरती थांबलीभूमी अभिलेख विभागात १,२०० विविध पदे भरण्याची प्रक्रिया वर्षभरापूर्वी हाती घेण्यात आली. यावर अजून तरी कुठलाही निर्णय झालेला नाही. वर्ग तीनमधील पदसमूह चारचा या पदभरतीत समावेश होता. या जागा भरल्या नसल्याने विभागापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
सर्व्हेअरच्या अडचणीसर्व्हेअरना आता दरमहा २५ ते ३० मोजण्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे. नियमित १२ ते १५ एवढ्याच मोजण्या कराव्या लागतात. त्यामुळे वाढलेली कामे पूर्ण न झाल्यास कारणे दाखवा, शिस्तभंग, वेतनवाढ रोखणे आदी कारवायांचा सामना सर्वेअरना करावा लागत आहे. सर्व्हेअरला लॅपटॉप उपलब्ध करून दिलेला नाही. प्रत्यक्षात २,५०० सर्वेअर काम करत असताना काही महिन्यांपूर्वी ८०० लॅपटॉप उपलब्ध करून दिले.
अपुऱ्या संख्येमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. त्यांना शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागत आहे. तसेच काम कमी झाल्यास कारवाईही केली जाते. या अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेतली जाईल.- श्रीराम खिरेकर, सरचिटणीस, विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना.
अशा रखडल्या मोजण्या विभाग संख्या१. पुणे विभाग ४६,०००२. नागपूर विभाग १२,०००३. नाशिक विभाग १२,०००४. औरंगाबाद विभाग १०,०००५. अमरावती विभाग १५,६०० ६. मुंबई विभाग ११,५००