ठाणे : आजकालची मुले ही झिंगाटसारख्या गाण्यांकडे वळत आहेत; परंतु अशाने देश घडत नाही, अशी टीका शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी केली. ठाण्यात शिवचरित्र विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. येथील राज्याभिषेक समारोह संस्थेने रविवारी श्रीराम व्यायामशाळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्डे म्हणाले की, हिंदुस्थानात धर्म संपवायला अनेक आक्रमणे येत आहेत. त्याविरुद्ध लढायचे असेल, सशक्त व बळकट व्हायचे असेल तर ती आक्रमणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ३५० वर्षांपूर्वी या हिंदुस्थानावर अनेक आक्रमणे आली तेव्हा शिवाजी महाराजांनी या आक्रमणांना तोंड देत ही हिंदू भूमी जिवंत ठेवली. किल्ले स्पर्धेत सहभागी झालेल्या ठाण्यातील मुलांचे कौतुक करीत कर्डे म्हणाले की, हल्ली किल्ल्यांची वाईट अवस्था झालेली आहे. बुरूज पडले आहेत, प्रवेशद्वार ढासळले आहेत, राजगादी नाही, दगडधोंड्याशिवाय तेथे काही नाही. पुढील दहा वर्षांत किल्ल्यांची काय अवस्था होईल हे सांगता येत नाही. आमची संस्कृती, धर्म जिवंत राहिला हे त्या पडलेल्या किल्ल्यांचे महत्त्व आहे. किल्ले भरवणाऱ्या मंडळांमुळे आणि या मंडळांतील सुसंस्कृत लोकांमुळे आज देश टिकला आहे. आदिवासी पाड्यांत धर्मांतर करून हजारो आदिवासी बाटवले जातात. आमच्या धर्मावर येणारी आक्रमणं कोण करते हे सांगितले पाहिजे. पैसे देऊन आदीवासींना बाटवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. किल्ले आता पिकनिक स्पॉट झाले आहे अशी खंत व्यक्त करीत ते म्हणाले की, आपले किल्ले हे शौर्याची हकिकत असून त्यांना आजच्या या तरुणांनी भेट द्यावी आणि त्या किल्ल्यांची माती कपाळाला लावावी. सणासुदीला बाहेर जाऊन, नको त्यापेक्षा किल्ले बनवून आपला इतिहास जागृत ठेवण्याचे काम ही मुले करीत आहेत, अशा शब्दांत ठाणेकरांचे त्यांनी कौतुक केले.
‘झिंगाट’ गाण्याने देश घडत नाही
By admin | Published: November 09, 2016 3:46 AM