यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेसकडून आमदार विकास ठाकरे हे आव्हान देणार आहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये २०१४ पासून भाजपाने वर्चस्व निर्माण केलं आहे. तसेच गडकरी येथून सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने जिंकले आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये विजय मिळवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. ‘हायवे मॅन’ सिनेमाप्रमाणे गडकरीही निवडणुकीत फ्लॉप होतील आणि नागपूरमधून काँग्रेस व महाविकास आघाडीचा उमेदवार २.५ लाख मताधिक्क्याने विजयी होईल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, नागपूरमध्ये भाजपाचा उमेदवार कोण आहे हे महत्वाचे नाही. ही लढाई विचाराची आहे. हायवे मॅन चित्रपट फ्लॉप झाला, मोदींवर काढलेला चित्रपटही फ्लॉप झाला पण मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट मात्र सुपरहिट झाला होता. आज जनतेला गांधी विचाराची आवश्यकता आहे. विकासाच्या नावाखाली नागपूरचे बेहाल करुन ठेवले आहेत. नेमका कोणाचा विकास झाला? कुठे गेले मिहान? मालवाहतुक करणारी विमाने उतरतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, या आश्वासनांचे काय झाले. नागपूर शहरात सिमेंटचे रस्ते बनवले आहेत, आधीच नागपुरात जास्त तपमान व आता सीमेंटचे रस्ते यामुळे तापमान आणखी वाढणारच. स्थानिक मुद्द्यांबरोबरच राष्ट्रीय मुदद्यांवरही या निवडणुकीत भर दिला जाणार आहे. काँग्रेस पक्षात एकजूट असून नागपूरमधून काँग्रेस व महाविकास आघाडीचा उमेदवार २.५ लाख मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीच्या विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्याला आदरांजली अर्पण करण्यात आली व नंतर अर्ज दाखल करण्यात आला. विकास ठाकरे यांचा अर्ज दाखल करतेवेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनिल केदार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, अनिस अहमद, आ. अभिजीत वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रामकिसन ओझा, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.