पुणे : हा देश कोणाची जहागीर नाही. काही लोक तसे समजतात. ते देशाला कमकुवत करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या विरोधात जे कोणी असतील त्यांना आमची साथ आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी हिंदुत्ववाद्यांचे नाव न घेता त्यांना टोला मारला.कोंढवा परिसरातील नागरिकांनी पवार यांच्या उपस्थितीत रोजा इप्तार पार्टीचे आयोजन केले होते. खासदार सुप्रिया सुळे, पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, आमदार अनिल भोसले, स्थानिक नगरसेवक नंदा लोणकर, पी. ए. इनामदार, फारूख इनामदार तसेच मुस्लिम समाजातील अनेक स्थानिक नागरिक, मौलवी, आदी या पार्टीला उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘देश आपल्याच मालकीचा आहे अशा प्रकारे काही जण वागत आहेत. त्यांना इथला भाईचारा पटत नाही. त्यात खो घालण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांच्या अशा वागण्याने हा देश कमकुवत होत आहे. त्यांचे वागणे बेजबाबदारपणाचे आहे.’’पवार यांच्या स्वाक्षरीनेच या पार्टीचे निमंत्रण स्थानिकांना देण्यात आले होते. या निमंत्रणाचे मोठे फ्लेक्स सर्वत्र लावण्यात आले होते. मोलाना अक्रम मदारी यांच्या प्रार्थनेनंतर पवार यांच्या हस्ते मंडपात जमलेल्या असंख्य नागरिकांनी रोजाचा उपवास सोडला. मदारी यांनी पवार यांना अल्हाताला शक्ती देवो अशी प्रार्थना केली. महापौर प्रशांत जगताप यांनी उपस्थिताचे स्वागत केले. माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक विशाल तांबे, अप्पा रेणुसे, बंडू केमसे, शिवलाल भोसले, पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे व अन्य अनेक नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या पार्टीला उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हा देश कोणाची जहागीर नाही : शरद पवार
By admin | Published: June 22, 2016 1:10 AM