कऱ्हाड : आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आमीर खानने केलेले असहिष्णुतेचे वक्तव्य हा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. काही जण त्याला चुकीच्या पद्धतीने विरोध करून त्याने मांडलेल्या विचाराला बळकटी देत आहेत. चुकीच्या पद्धतीने विरोध हीच खरी असहिष्णुता आहे. त्याला देश सोडायला काही जण सांगतात; परंतु हा देश म्हणजे कोणाची खासगी मालमत्ता नाही, अशा भाषेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबंधितांना फटकारले.येथील वेणुताई चव्हाण स्मारकात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशाने आमीरला खूप मोठी प्रसिद्धी व पैसा दिला, असे टीकाकार म्हणत असले तरी, त्याने ते आपल्या कलेतून मिळविलेले आहे. त्याला कुणी देणगी दिलेली नाही, असे सांगून पवार म्हणाले, असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची सरकारने तयारी केली आहे. त्यामुळे संसदेत याबाबत सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा वाटते. सध्याचे केंद्र शासन लोकांचे प्रश्न सोडविताना दिसत नाही. जे काही ऐकायला मिळते ते देशाबाहेर, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.कृषिमंत्री एकनाथ खडसे म्हणतात त्याप्रमाणे भरघोस मदत मिळाली तर त्यांचे कौतुकच करावे लागेल. आज साखरेचे भाव पाहता एफआरपी देण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपयांचा फरक पडतो, त्यामुळे शासनाच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांना एफआरपी देणे कारखानदारांना अवघड पडेल, असेहीे पवारांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सचिवांना दोष कशाला ? अनेक वर्षे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहोत. मात्र अधिकारी ऐकत नाही, असा अनुभव आजवर कधीही आला नाही. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांचे अधिकारी ऐकत नाहीत, हे वक्तव्य विचार करायला लावणारे असून, अनेक बाबींना जर मंत्री जबाबदार असतील तर सचिवांना दोष देण्यात काय अर्थ, असेही त्यांनी सांगितले. ‘मध्यावधी निवडणुकी’चे आश्चर्य वाटायला नको ! : मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. जनता सध्या परिवर्तनाच्या भूमिकेत असून निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस-राष्ट्रवादीच योग्य पर्याय देऊ शकतो. मात्र, काँग्रेसबरोबर याबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, त्यांच्याकडून असा प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला योग्य प्रतिसाद देऊ, असेही पवार म्हणाले.
देश कोणाची खासगी मालमत्ता नाही!
By admin | Published: November 26, 2015 3:03 AM