नागपूर : महानगरपालिकेने एड्स जनजागृती कार्यक्रमाला हनुमान चालिसा पठणाद्वारे धार्मिक स्वरूप दिल्यामुळे संतप्त झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा देश केवळ हिंदूंचा आहे काय, असा सवाल मंगळवारी केला.कस्तुरचंद पार्क येथे गुरुवारी आयोजित एड्स जनजागृती कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिक यावेत यासाठी महानगरपालिकेने हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम ठेवला आहे. याविरुद्ध दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी मनपाला धारेवर धरले. गर्दीच जमवायची आहे तर, बायबल, कुराण, धम्मपद इत्यादी धार्मिक ग्रंथांचे पठण का आयोजित केले नाही? हा देश केवळ हिंदूंचा आहे काय, असा सवाल न्यायालयाने केला.एड्सचे रुग्ण केवळ एकाच धर्मात नाहीत. यामुळे सार्वजनिक कार्यक्रमाला धार्मिक स्वरूप देता येणार नाही. हा देश बहुधर्मीय असून प्रत्येक धर्मातील नेते त्यांच्या पसंतीनुसार कार्यक्रम घेण्यास स्वतंत्र आहेत. कोणताही शासकीय कार्यक्रम अशा पद्धतीने होत नाही. महानगरपालिका राज्य शासनाचे एक अंग आहे. यामुळे महानगरपालिकेला विशिष्ट धर्माच्या कार्यक्रमाशी जोडून घेता येणार नाही. मनपा धार्मिक कार्यक्रमाशी जोडली गेल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यांना केवळ वीज, पाणी इत्यादी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यापुरते मर्यादित राहावे लागेल, असे मत व्यक्त करत न्यायालयाने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)हनुमान चालिसा पठणासाठी पंजाबी गायक लखविंदरसिंग लख्खा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी आशा भोसले यांना का बोलावले नाही, अशी कोपरखळी न्यायालयाने मारली. हनुमान चालिसा पठण ठेवल्यावर एड्स जनजागृती कार्यक्रमाला एकाच धर्मातील लोक येतील. यामुळे अन्य धर्मांतील लोकांना या कार्यक्रमापासून वंचित ठेवल्यासारखे होईल, याचा मनपाला विसर पडला होता का? असा सवाल उच्च न्यायालयाने केला.
हा देश केवळ हिंदूंचा आहे का?
By admin | Published: April 07, 2016 2:31 AM