पुणे - मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तरीही मराठी शाळा बंद पडत आहेत, हे दुर्दैव आहे. भारताला प्राचीन आणि समृद्ध संस्कृती लाभली आहे. तरीही देशाला अद्याप स्वतःची भाषा जाहीर करता आलेली नाही, घटनेत नमूद केल्याप्रमाणे हिंदी ही आपली संपर्क भाषा आहे, देशाला कोणतीही एक भाषा नाही, अशी खंत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे बुक फेअर उद्घाटन समारंभ बुधवारी गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अनिल गोरे, मसापाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
रावते म्हणाले, 'घरात मूल जन्माला आल्यापासून त्याला इंग्रजी आले पाहिजे असा अट्टाहास धरला जातो. दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत, मराठी शिक्षक अतिरिक्त आहेत, अशी ओरड करून आंदोलन केले जाते. त्यापेक्षा पालंकानी मुलांना मराठी शाळेत शिक्षण देण्याचा निश्चय केला पाहिजे. मातृभाषेतूनच बौद्धिक विदवत्ता मिळते.'
एसटी कर्मचाऱ्याची पगारवाढ व्हायला हवी, याबाबत दुमत नाही. वेतन करार करायला सरकार तयार आहे. मात्र, कर्मचार्यानी सातव्या वेतन आयोगाची मागणी केली आहे. देशात कुठेच हा आयोग लागू नसल्याने ते केवळ मृगजळाचया मागे धावत आहेत, अशी टिपण्णीही रावते यांनी केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रवासात, निवांत वेळी पु.ल. देशपांडे, व.पू. काळे, गीतरामायण यांच्या ध्वनिफिती ऐकत असत. तोच सुसंस्कार शिवसैनिकांवर झाला. अर्थात, सुधीर फडके यांचे गीतरामायण येथे अभिप्रेत आहे. सध्या नव्याने रामायण लिहिले जात असून, वाल्याचा वाल्मिकी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा शब्दात नारायण राणेंचा नामोल्लेख टाळत त्यांनी भाजपला चिमटा काढला.