पुणे : शहरातील उजाड झालेल्या टेकड्यांवरील जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी वन विभागाने सुरुवातीच्या काळात परदेशी झाडे लावली होती़ या झाडांमुळे तेथील जमिनीची सुपिकता वाढली असल्याने आता त्यांच्या जागी देशी वृक्ष लावण्यात येणार आहेत, त्याला शासनाने मान्यता दिली आहे़ पर्वती पाचगाव, भांबुर्डा येथील वन विभागाच्या जागेवर दोन दशकांपूर्वी परदेशी झाडे लावली होती़ या झाडांमुळे जमीन संवर्धनाचे काम झाले असून, या झाडांची मुळे खोलवर जातात़ त्यामुळे ही झाडे गिरीपुष्प किंवा उंदीरमार या नावानेही ओळखली जातात़ टेकड्यांवरील जमीन हिरवीगार व्हावी व तेथील जमिनीचे संवर्धन व्हावे, यासाठी सुरुवातीच्या काळात ही परदेशी झाडे लावली होती़ त्यांच्यामुळे जमिनीचे संवर्धन झाले असले, तरी त्यांच्या आसपास देशी वृक्ष तग धरू शकत नाही; तसेच पावसाळा संपताच ही झाडे उजाड होतात़ ही झाडे झुडपांच्या स्वरूपात असल्याने पावसाळ्यानंतर ती निष्पर्ण दिसू लागतात़ पुढील ८ महिने त्यांच्या केवळ फांद्या दिसतात़ त्यामुळे आता त्यांच्या जागी नवीन देशी वृक्ष लावण्याची वन विभागाची योजना आहे़ याबाबतचा प्रस्ताव वन विभागाने शासनाकडे पाठविला होता़ त्याला शासनाने मान्यता दिली असून, दर वर्षी १ हेक्टर जागेवरील परदेशी झाडे काढून, त्या जागी देशी वृक्ष लावण्यास शासनाने मान्यता दिली आहे़ याबाबत वन विभागाचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी सांगितले की, शहराभोवतालच्या टेकड्या वर्षभर हिरव्यागार दिसाव्यात, यासाठी वन विभागाचा प्रयत्न आहे़ लोकसहभागातून ते शक्य असल्याचे वारजे येथे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पातून दिसून आले आहे़ भांबुर्डा, पाचगाव पर्वती येथील परदेशी झाडांमुळे जमिनींचे संर्वधन झाले आहे़ त्याचा सर्व्हे करण्यात आला असून, त्याठिकाणी आता वड, पिंपळ, आवळा, कडुलिंब असे देशी वृक्ष लावण्यात येणार आहेत. आपल्याकडे कोणतेही झाड तोडले की, लगेच त्यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो़ त्यामुळे ही झाडे काढण्याअगोदर जनजागृती करून त्यामागची कारणे सर्वांना सांगण्यात येणार आहेत. वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आले असून, आतापर्यंत १५ किमी भिंतीचे काम झाले आहे. यंदा ८ ते १० किमीच्या सरंक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात येणार आहे़ एकदा जमिनीचे संरक्षण झाले की, निसर्गच पक्ष्यांमार्फत वनीकरणाचे काम करीत असतो़
परदेशी झाडांच्या जागी आता देशी वृक्ष
By admin | Published: June 27, 2016 12:59 AM