ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 9 - नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजांचा चाबूक मोर्चा काढण्यात आला होता. देशात नोट बंदीचा निर्णय घेऊन ६० दिवस उलटवून गेले आहेत. हा निर्णय जाहीर करताना ५० दिवस कळ सोसा त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर मी हंटरने मार खाण्यास तयार आहे. मोदी यांच्या या वक्तव्याचा धागा पकडून ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने पोतराजांच्या अंगावर चाबूक मारायचे आंदोलन केले.
ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, सरचिटणीस माजी खासदार संजीव नाईक, ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि आंदोलनकर्ते नागरिक आणि पक्षाचे मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या मोर्चात नाका कामगार, भाजी विक्रेते, रिक्षा चालक यांच्यासारख्या हातावर पोट असणार्यांनीही या मोर्चात सहभागी होऊन आपल्या व्यथा मांडल्या. अनेकांनी तर पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारला लाखोली वाहिली.
यावेळी नोट बंदीच्या निर्णयाबाबत बोलताना आव्हाड यांनी मोदी सरकारचा निषेध केला. मोदी यांच्या या निर्णयाला ५० दिवस होऊन गेले. या दिवसात देशातील ५० टक्के व्यापार धोक्यात आला आहे. असंघटित कामगार देशोधडीला लागला आहे. नागरिक सैरभैर झाला आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळत आहे. गरीबाच्या घरातील चूल पेटणे बंद झाले आहे. काळा पैसा बाहेर न येता केवळ सामान्य नागरिकांनी डाळ पिठासाठी ठेवलेला पैसा बाहेर काढू तो बँकेत जमा करावा लागला. आता तो पैसा काढण्यासाठी त्यांना बँकेसमोर रांगेत उभे राहूनही त्यांच्या हातात पैसा पडेनासा झाला आहे. त्यामुळे या देशात मोठा संताप तयार होत असून देशात हे त्रस्त नागरिक कधीही लोकशाही पद्धतीने आग लावतील असा इशारा दिला.
https://www.dailymotion.com/video/x844nod