वर्धा : गाव समृद्ध करणे, युवकांना रोजगार देणे तसेच कृषीमध्ये सुधारणा करण्याकरिता संचार, समन्वय आणि सहयोग या त्रिसूत्रीवर काम करणे गरजेचे आहे. जोवर गाव, गरीब, मजूर, शेतकरी आत्मनिर्भर होणार नाहीत, तोवर देश आत्मनिर्भर होणार नाही. आत्मनिर्भर भारताकरिता प्रतिभावंत युवकांना प्रेरित करून ग्रामीण भागात पाठविले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केले.महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात ‘वर्धा मंथन-२०२१ : ग्राम स्वराजची आधारशिला’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू रजनीशकुमार शुक्ल होते. महात्मा गांधी केंद्रीय विश्वविद्यालय, मोतिहारी (बिहार)चे कुलाधिपती तथा खादी व ग्रामोद्योग आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. महेश शर्मा, खासदार रामदास तडस, विनोबा भावे यांचे सचिव राहिलेले बालविजय भाई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.डॉ. महेश शर्मा म्हणाले की, आज आर्थिक असमानता वाढली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा मार्ग दाखविला. बालविजय भाई यांनी गांधी व विनोबा यांनी ग्रामस्वराज्याचा पाया वर्ध्यातच रचला. ग्रामस्वराज्याची ब्लू प्रिंट वर्धा मंथन या कार्यशाळेतून मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कुलगुरू रजनीशकुमार शुक्ल यांनी वर्धा मंथनच्या माध्यमातून शेतकरी, कारागीर, शिल्पकार यांच्यावर चर्चा करून स्वावलंबी व आत्मनिर्भर भारताची संकल्पना यावर दस्तावेज तयार होऊ शकेल, असे सांगितले. या कार्यशाळेचा रविवारी समारोप होणार आहे.
गाव समृद्ध झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 3:16 AM