जळगाव : देशभरात बेकायदेशिररित्या चालविल्या जाणाऱ्या आॅनलाईन औषध विक्रीच्याविरोधात १४ रोजी संपूर्ण देशात औषध विक्रेत्यांनी बंद पाळण्याचा निर्णय राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. त्यात देशभरातील आठ लाख विक्रेते सहभागी होणार आहेत. राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीच्या विशेष सभेनंतर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीररीत्या व्यवसाय सुरू आहे. याद्वारे नार्कोटीक्स ड्रग्ज, झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या, कोडिन सिरप यासारख्या अनेक धोकादायक औषधांची विक्री सुरू असून युवा पिढी याचे बळी ठरत आहे. शासनाच्या निदर्शनास आणूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच प्रारंभी एक दिवसाचा बंद व त्यातूनही निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे, असे ते म्हणाले.
आॅनलाइन औषधविक्रीविरोधात देशव्यापी बंद
By admin | Published: October 05, 2015 3:32 AM