मुंबई : सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तातडीने समिती स्थापन करण्याची मागणी करत ‘आॅल इंडिया फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशन्स’ या प्राध्यापकांच्या शिखर संघटनेने सोमवारी देशव्यापी धरणे आंदोलन केले. राज्यातील प्राध्यापकांचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशन्सने आझाद मैदानात धरणे देत देशव्यापी धरणे आंदोलनात सहभाग घेतला.केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या वेतन आयोगापेक्षा प्राध्यापकांना लागू होणाऱ्या वेतन आयोगात काही बदल असतात. त्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने प्राध्यापक संघटनांशी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. मात्र गेल्या वर्षभरात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी संघटनेला चर्चेसाठी वेळ दिलेला नाही. शिवाय संबंधित समितीचीही स्थापना करण्यात आलेली नाही. त्यामुळे तत्काळ समिती स्थापन करून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी प्राध्यापकांनी केली आहे. या आंदोलनात राज्यातील १० अकृषी विद्यापीठ आणि ११ प्राध्यापक संघटनांनी सहभाग घेतला होता. सरकारने प्राध्यापकांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही, तर नोव्हेंबर महिन्यात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने या वेळी दिला आहे.
सातव्या वेतन आयोगासाठी देशव्यापी धरणे
By admin | Published: October 06, 2015 3:17 AM