- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 -देशव्यापी संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प पडले असताना अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांनी बंदमध्ये सामील झाल्याची घोषणा केली. शिक्षणाच्या हक्कासाठी विविध १७ संघटनांमधील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी चर्नीरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयापासून राजभवनावर धडक मोर्चा काढला.
पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मोर्चा पोलीस जिमखाना मैदानात वळविण्यात आला. तेथे मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी शिक्षक आमदार कपिल पाटील म्हणाले की, २८ ऑगस्टचा काळा शासन निर्णय तत्काळ सरकारने रद्द करायला हवा. सरकारकडून मुठभर लोकांसाठी राबवण्यात येणाºया शैक्षणिक धोरणांना सर्व संघटनांचा विरोध आहे. पात्र शाळांना १०० टक्के अनुदान मिळायला पाहिजे. शिवाय शिक्षण हे गरिबांसाठी असावे. देशव्यापी संपाला पाठिंबा असून यापुढेही तीव्र आंदोलन केले जाईल. महाराष्ट्र राज्य अशासकिय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेने शुक्रवारी संपात सामील होण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील ४०० हून अधिक आयटीआय शुक्रवारी बंद होते. आयटीआय प्रवेशासाठी येणाºया विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये, म्हणून संघटनेने प्रत्येक आयटीआयवर एक प्रतिनिधी ठेवला होता. मात्र आयटीआयमधील प्रशिक्षण यावेळी बंद ठेवण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी दिली.
संपात सामील झालेल्या शैक्षणिक संघटना -
एमफुक्टो, एएनजीसी, बुक्टो, शिक्षक भारती, शिक्षण हक्क कृती समिती, महामुंबई संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघ, प्राथमिक शिक्षक भारती, अनुदानित शिक्षा बचाव समिती, शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज युनिट, आर्च बिशप शाळा, सीसीटीओबी, शिक्षक भारती मनपा युनिट, अंजुमन इस्लाम खैरुल इस्लाम उर्दू शाळा, शिक्षक भारती आश्रमशाळा विभाग, नॉन गर्व्हमेंट कॉलेज असोसिएशन, कला-अध्यापक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य अनुदानित शारीरिक शिक्षक संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक युनिट या संघटना सहभागी झाल्या होत्या.
(फोटो : सुशील कदम)