कऱ्हाड (जि.सातारा) : कर्जाला कंटाळून दाम्पत्याने आपल्या तीन चिमुरड्यांना कोयना नदीपात्रात फेकून देऊन त्यांचा खून केला. त्यानंतर स्वत: दोघांनी नदीत उडी घेतली. मात्र, पती सुरक्षितरीत्या नदीपात्रातून बाहेर पडला आणि पत्नीसह दोन मुले व चार महिन्यांच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळपर्यंत पत्नीसह मुलगी व एका मुलाचा मृतदेह पोलिसांना मिळाला असून, एका मुलाचा नदीपात्रात शोध घेतला जात होता.मिनाक्षी अमोल भोंगाळे (२३), हर्ष (साडेतीन वर्ष) व श्रवण (दीड वर्ष) हे तिचे दोन मुलगे व चार महिन्यांची मुलगी यांचा मृतात समावेश आहे. या घटनेतून अमोल हणमंत भोंगाळे (२८, मलकापूर, कऱ्हाड) बचावला आहे. अमोल भोंगाळे हा मलकापुरात सहकुटुंब वास्तव्यास होता. आर्थिक परिस्थिती खालावल्याने सध्या हे कुटुंब नैराश्येखाली होते. त्यातच अनेक महिन्यांपासून अमोल काम करीत नव्हता. हातउसने व कर्ज स्वरूपातही त्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. हे पैसे त्याने परत केले नव्हते. परिणामी अमोलसह त्याची पत्नी मिनाक्षी हे दोघेही तणावाखाली होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तीन मुलांना घेऊन भोंगाळे दाम्पत्य मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास दुचाकीवरून पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोयना पुलावर आले. तेथून अमोलने त्याचा चुलत भावाला फोन करुन ‘मी कुटुंबासह कोयना पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करीत आहे,’ असे सांगितले. त्या भावाने ही माहिती तातडीने कऱ्हाड शहर पोलिसांना दिली. सर्वांनीच नदीपात्रात उडी घेतल्याची शक्यता बळावल्याने पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला.घटनेनंतर सुमारे एक तासाने अमोल नदीपात्रातून बाहेर आला. घटनास्थळी शोध घेणाऱ्या पोलिसांना तो सापडला. ‘कोणीतरी मला नदीतून बाहेर काढले. मात्र, कोणी काढले हे माहीत नाही,’ असे त्याने पोलिसांना सांगितले. त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
तीन चिमुरड्यांना नदीत फेकून जोडप्याची आत्महत्या
By admin | Published: March 15, 2017 4:00 AM