मुंबई : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना ५० कोटी रुपये भरण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देत उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा दिला आहे. २५ जानेवारीपर्यंत डीएसकेंच्या खात्यात ५१ कोटी रुपये जमा होण्याची शक्यता असल्याने न्यायालयाने त्यांना ही मुदतवाढ दिली.पोलिसांनी सर्व बँक खाती गोठविल्याने डीएसकेंना ५० कोटी रुपये जमविण्यासाठी सर्वत्र वणवण करावी लागत आहे. मात्र, पैशाची तजवीज करण्यात आली आहे, असे डीएसकेंच्या वकिलांनी न्या. साधना जाधव यांना सांगत यासंबंधीचे कागदपत्र न्यायालयात सादर केले.प्रभुणे इंटरनॅशनल या डीएसकेंच्याच परदेशी कंपनीमार्फत ८० लाख अमेरिकन डॉलर्स डीएसकेंच्या ‘बँक आॅफ बडोदा’ या बँकेत जमा करण्यात आले आहेत. मात्र, ही रक्कम डीएसकेंच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आणखी ७२ तास लागतील. त्यामुळे न्यायालयात ५० कोटी रुपये जमा करण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदत देण्याची विनंती डीएसकेंच्या वकिलांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पैसे भरण्यास मुदतवाढ देत पोलिसांना या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. २५ जानेवारीला डीएसकेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होईल.
डीएसकेंना पैसे भरण्यासाठी न्यायालयाकडून पुन्हा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 3:53 AM