मुंबई - जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे तालुका क्षेत्रासाठी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय तर अकोट (जि. अकोला) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.चाळीसगाव तालुक्यात एकूण १४२ महसुली गावे असून तालुक्यापासून जिल्ह्याच्या ठिकाणचे अंतर ११५ कि.मी. आहे. तालुक्याच्या हद्दीवर असणारी गुजरदरी ६० कि.मी., जुनोने ३५ कि.मी., पिंजारेपाडे व रामनगर ही गावे ३५ कि.मी. इतक्या अंतरावर आहेत. येथील जनतेला जिल्हा न्यायालयातील कामांसाठी जळगाव येथे जावे लागते. त्यामुळे तालुक्यातील जनतेची सोय व्हावी यासाठी चाळीसगाव येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे न्यायदानाची प्रक्रिया अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. जळगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाची एकूण १४२८ प्रलंबित प्रकरणे चाळीसगावच्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत.वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय अकोट येथे स्थापन करणारअकोट (जि. अकोला) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास तसेच त्यासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्यासदेखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या न्यायालयाच्या स्थापनेमुळे अकोला व तेल्हारा या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांची सोय होणार असून न्यायदानाची प्रक्रिया लोकाभिमुख व वेगवान होणार आहे.
चाळीसगाव, अकोट येथे न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 5:12 AM