मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळयाप्रकरणी पंकज भुजबळ यांनी अजामिनपात्र वॉरंट रद्द करणसाठी व त्यांच्यावरील गुन्हे रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मात्र याचिका बोर्डावर नसतानाही भुजबळ यांच्या वकिलांनी तीनदा न्यायालयापुढे सुनावणीसाठी आणल्याने उच्च न्यायालयाने वकिलांना खडसावले. या मनमानीला आळा बसवण्यासाठी बार कौन्सिलनेही यात लक्ष घालावे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होणार होती, मात्र या याचिकेवरील सुनावणी नसतानाही पंकज भुजबळ यांच्या वकिलांनी खंडपीठापुढे आणली. यापूर्वीही दोनदा असे घडल्याने उच्च न्यायालयाने भुजबळांच्या वकिलांना धारेवर धरले.‘तुम्ही हे तिसऱ्यांदा करत आहात. केस सुनावणीसाठी नसतानाही आमच्यासमोर सादर करत आहात. तुम्हाला वाटत असेल की न्यायालये वकिलांच्या सोयीनुसार चालवली जातात. न्यायालये वकिलांच्या सोयीनुसार चालत नाहीत. असे वागून तुम्ही न्यायालयाचा अपमान करत असाल तर आता धडधडीत संदेश देण्याची वेळ आली आहे. वकिलांचा मनमानी कारभार चालणार नाही,’ अशा शब्दांत खंडपीठाने पंकज भुजबळांच्या वकिलांना खडसावले.वकिलांच्या मनमानीला आळा बसवण्यासाठी बार कौन्सिलनेही यात लक्ष घालावे, असे म्हणत खंडपीठाने याचिकेरील सुनावणी ४ जुलैपर्यंत तहकूब केली. (प्रतिनिधी)
पंकज यांच्या वकिलांना कोर्टाने खडसावले
By admin | Published: June 28, 2016 4:08 AM