ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 4 - लष्कर जवान रॉय मॅथ्यू याच्या आत्महत्येचं गूढ उकललं जाण्याची शक्यता असून यामध्ये पोलिसांच्या हाती लागलेली डायरी महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जो व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात आला त्यात आपला आवाज नव्हता असं मॅथ्यूने डायरीत लिहिलं आहे. मॅथ्यूच्या या डायरीला सुसाईड नोट म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतं. कोर्ट मार्शल होण्यापेक्षा मृत्यू परवडला असं मॅथ्यूने आपल्या डायरीत लिहिलं आहे. त्याने आपल्या डायरीत पत्नी आणि कुटुंबासहित आपल्या कर्नलची माफी मागितली आहे.
सैनिकांना घरगड्यासारखे राबविणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांचा स्टिंग ऑपरेशनद्वारे भांडाफोड करून ते सोशल मीडियावर टाकणाऱ्या देवळाली कॅम्पमधील लष्कर जवान रॉय मॅथ्यू याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. लष्कराच्या तोफखाना विभागातील जवान डी.एस. रॉय मॅथ्यू (३५) याने बॅरेकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. २४ फेब्रुवारीपासून तो बेपत्ता होता. त्याच्या मृत्यूची केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत चौकशी होणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी शुक्रवारी सांगितले.
रॉय मॅथ्यू याने वरिष्ठ अधिकारी सैनिकांना कसे घरगड्यासारखे राबवून घेतात. मुलांना शाळेत सोडणे, कुत्र्यांना फिरविणे, भांडी घासणे आदी कामे करून घेतली जात असल्याचे चित्रीकरण करून सैनिकांच्या व्यथेला वाचा फोडली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. व्हिडीओमुळे निर्माण झालेल्या वादाशी मॅथ्यूचा काही संबंध आहे का, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे समजते. रॉयचा मोबाइल व मल्याळम भाषेतील त्याची डायरी पोलिसांना मिळाली आहे.
नाशिक पोलीस त्याच्या युनिटमधील इतर जवानांची चौकशी करत आहे. ज्या पत्रकाराने हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं त्याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. मॅथ्यूच्या पत्नीचीही जबाब नोंदवला जाणार आहे, जेणेकरुन फोनवर शेवटचं बोलणं झालं तेव्हा मॅथ्यूने काय सांगितलं होतं याची माहिती मिळावी. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करण्याआधी मॅथ्यू पत्नीशी फोनवर बोलताना रडला होता. तसंच आपल्या अधिका-याला माफीचा मेसेज पाठवला होता.
मॅथ्यूच्या शरिरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळलेल्या नाहीत. कुटुंबाने मात्र सत्य लपवलं जात असल्याचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत असून लष्करानेही कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.