मुंबई : मतदार यादीतून नाव गायब झाल्याने मतदान करता न आलेल्या मुंबई व पुण्यातील नागरिकांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संसदेतील भाषणाचा दाखला देत न्यायालयाचे दार ठोठावले़ पण या नागरिकांना डॉ़ आंबेडकरांच्या या भाषणाचा अर्थच कळला नाही़ मुळात डॉ़ आंबेडकर यांनी सुस्त न राहता दक्ष राहण्याचा सल्ला दिला होता, याची आठवण करून उच्च न्यायालयाने मुंबई व पुण्यातील काही ठिकाणी लोकसभेसाठी पुन्हा मतदान घेण्याची मागणी फेटाळून लावली़ गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीतून नावे गायब झालेल्या मुंबई व पुण्यातील काही नागरिकांनी ही याचिका केली आहे़ त्यात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर व त्यांची पत्नी यांचाही समावेश आहे़ तर प्रताप गायकवाड यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली असून, अग्नी या सामाजिक संघटनेने या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे़ या सर्व याचिकाकर्त्यांनी मतदान यादीतून नावे गायब झालेल्याला सर्वस्वी निवडणूक अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला. केवळ या मागणीवरचा निकाल न्यायालयाने सोमवारी जाहीर केला़ त्यात न्या़ अभय ओक व न्या़ एम़एस़ सोनक यांच्या खंडपीठाने अभिनेते पालेकरांसह सर्व याचिकाकर्त्यांचा समाचार घेतला़ न्यायालय म्हणाले, प्रत्यक्षात मात्र मतदार यादीचा मसुदा २०१३मध्ये प्रसिद्ध झाला व याची अंतिम यादी ३१ जानेवारी २०१४मध्ये जाहीर झाली़ आपले नाव यादीत नसल्याची खातरजमा केल्याचे उदाहरण देता आले नाही़ विशेष म्हणजे अमोल पालेकर यांचा राहण्याचा पत्ता मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील असून, त्यांनी तक्रार पुण्यात केली.
पुण्यात फेरमतदानाची मागणी कोर्टाने फेटाळली
By admin | Published: May 13, 2014 3:59 AM