मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्यांतील मुख्य आरोपी आ. रमेश कदम याचा जामीन अर्ज आज विशेष सत्र न्यायाधीश आर.एम. पांडे यांनी फेटाळला. कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कदम आणि त्याचा सहकारी विजय कसबे याने सीआयडीकडून अटकेनंतर ६० दिवस उलटले तरी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल न झाल्याने जामीन मिळावा, असा अर्ज न्यायालयात केला होता. मात्र, या दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ४०९ आणि ४६७ या कलमांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही कलमांमध्ये आजन्म कारावासाची शिक्षा आहे. त्यामुळे आरोपपत्र ९० दिवसांच्या आत दाखल करता येते, असा युक्तिवाद सीआयडीतर्फे वकील प्रवीण चव्हाण यांनी केला. न्यायालयाने तो मान्य केला. कसबे याच्याविरुद्ध १६ आॅक्टोबरला आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कदमविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची ९० दिवसांची मुदत अजून संपायची आहे, हेही चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. कदम हा साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे. (विशेष प्रतिनिधी)
रमेश कदमचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
By admin | Published: October 21, 2015 3:54 AM