ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - न्यायालयाने न्यायदानाचे काम करावं, पण उत्सव व मंडपाच्या भानगडीत पडून श्रद्धांना ठेच लावू नये अशी रोखठोख भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. जेथे बंधन घालायचे तेथे मोकळे ठेवायचे व नको त्या मोरीला बूच लावत फर्माने सोडायचे अशा तिखट शब्दांत ठाकरेंनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सार्वजनिक उत्सवांच्या वेळी रस्त्यात उभारण्यात येणा-या मंडपावर बंदी टाकण्याचे आदेश दिले होते. या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून तीव्र नाराजी व्यक्त केली. मुसलमानांमधील मुल्लांचे फतवे आणि न्यायालयाचे फर्मान हे चेष्टेचा विषय ठरत आहे. न्यायालयांविषयी सर्वांनाच आदर असला तरी श्रद्धेच्या विषयात न्यायालयाने फर्मान काढण्याची आवश्यकता काय असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. हिंदूंचे सण, उत्सव व राष्ट्रीय सणांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोपही त्यांनी केला. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दहीहंडीचे सण बंद झाले तर समाजातील जीवंतपणा संपुष्टात येईल असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. न्यायालयांना न्यायदान करायचे असेल तर ते त्यांनी मसरत आलम ते सीमा प्रश्न अशा अनेक प्रलंबित विषयांवर करावे असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.