मुंबई : हनुमान चालिसाप्रकरणी गुरुवारी आरोप निश्चित करण्यात येणार असतानाही आरोपी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हजर न राहिल्याने विशेष न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करू, अशी तंबी विशेष न्यायालयाने दोघांनाही दिली.
नवनीत व रवी राणा यांच्या दोषमुक्ततेच्या याचिका नुकत्याच न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्यावर गुरुवारी आरोप निश्चित करण्यात येणार होते. दोषमुक्तता अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान द्यायचे असल्याने राणा यांच्या वकिलांनी दोन आठवड्यांची मुदत मागितली. त्यावर न्या. राहुल रोकडे यांनी संतप्त झाले. न्यायालय म्हणजे गंमत नाही. न्यायालयाने पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी ठेवली.