मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी तपास यंत्रणेला सव्वा वर्ष लागल्याने या खटल्याला अखेरीस डिसेंबरचा मुहूर्त सापडला आहे. २१ आॅक्टोबर रोजी या प्रकरणी अंतिम अहवाल सादर करणार असल्याचे सीबीआयने सोमवारी विशेष न्यायालयाला सांगितल्यावर न्यायालयाने डिसेंबरपासून या खटल्याला सुरुवात केली जाईल, असे स्पष्ट केले. पीटरच्या जामिनावर शनिवारी उच्च न्यायालयात सुनावणीत होती. सीबीआयने या हत्या प्रकरणात तिसरे आणि अंतिम दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती न्यायाधीशांना दिली. त्यानुसार सीबीआयने सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयालाही २१ आॅक्टोबरला या प्रकरणी अंतिम दोषारोपपत्र दाखल करू, असे सांगितले. त्यावर विशेष न्यायालयाने पुढील प्रक्रियेची माहिती वकिलांना दिली. ‘सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यापुढील आठवड्यात आरोप निश्चित करू. नोव्हेंबर पहिल्या आठवड्यापासूनच कागदपत्रे, साक्षीदारांना समन्स बजावणे व अन्य कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात येतील. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नियमितपणे खटल्याच्या सुनावणीस सुरुवात होईल,’ असे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
अखेर खटला सुरू होणार डिसेंबरमध्ये
By admin | Published: October 18, 2016 5:44 AM