पुणे : पंतप्रधान पीक विमा योजनेच्या आढावा बैठकीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बोलत असतानाच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर आढावा बैठक पुन्हा सुरू झाली.पुणे विद्यापीठ रस्त्यावरील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेत बुधवारी ही आढावा बैठक आयोजित केली होती. कृषीमंत्री बोंडे, राज्यमंत्री खोत, महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष भुतानी, सचिव (कृषी व जलसंधारण) एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे आणि राज्यातील शेतकरी प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. कृषी राज्यमंत्री खोत यांचे भाषण सुरु असताना दुपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन जोरदा घोषणा दिल्या.पीक विमा कंपन्यांच्या नफेखोरीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचा परतावा मिळत नाही, विमा कंपन्यांच्या फायद्यासाठीच सरकार धोरण राबवित असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप होता.कृषिमंत्र्यांनी उडविली खिल्ली, नंतर सारवासारवकोठेही घाण पडली की माध्यमे तेथे धावतात. त्यांनी शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या मिठाईकडे लक्ष द्यावे, असे म्हणत कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी माध्यमांची खिल्ली उडविली. पत्रकारांशी बोलताना मात्र सारवासारव करीत त्यांनी विमा योजनेत घोळ आढळल्यास संबंधित विमा कंपन्यांवर देखील कारवाई करु, असे आश्वासन दिले.
पीक विमा योजनेच्या बैठकीत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 5:46 AM