मुंबई : कोविड - १९ प्रकरणी फेब्रुवारीच्या सुरुवातीला चीनमधील वुहान शहरातून एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या ६४५ भारतीयांना दिल्लीच्या आय. टी. बी. पी. आणि मानेसर आर्मी कॅम्पमधील विलगीकरण कक्षात १४ दिवस ठेवले होते. त्यातील ३६ जण राज्यातील असून, त्यांचा कोरोनासाठीचा (कोविड-१९) चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने व त्यांचा विलगीकरण कक्षातील कालावधी संपल्याने ते बुधवारी राज्यातील आपापल्या मूळ गावी परतले.
सध्या दोन जण कस्तुरबा रुग्णालयात भरती आहेत. दरम्यान, बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण २६६ प्रवाशांपैकी १४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या सर्वांच्या प्रयोगशाळा चाचण्या कोरोना (कोविड - १९) व्हायरससाठी निगेटिव्ह आल्या आहेत. आपला विलगीकरण कालावधी संपल्यानंतर आता हे प्रवासी आपापल्या मूळ गावी परतले आहेत. खबरदारी म्हणून या प्रवाशांचा पुढील १४ दिवसांकरिता पाठपुरावा करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. १९ फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४१ हजार २०८ प्रवासी तपासण्यात आले. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून २६६ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील विविध विलगीकरण कक्षांत ७१ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ७० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना (कोविड - १९)करिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन. आय. व्ही., पुणे यांनी दिला आहे. आतापर्यंत भरती झालेल्या ७१ प्रवाशांपैकी ६९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.