कोल्हापूर : कोरोना महामारी संकटाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सहकारी साखर कारखानदारांनी कोविड हॉस्पिटल सुरु करावे, अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी साताऱ्यात दिल्या होत्या. त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहे.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना १०० खाटांचे अद्यावत कोविड काळजी केंद्र सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांच्या माध्यमातून आगामी काळात २,३०० करोना रुग्णांची सोय होणार आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यासंदर्भात सोमवारी सायंकाळी एक पत्र साखर कारखान्यांना पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी शंभर खाटांचे ऑक्सिजनेटेड काळजी केंद्र सुरू करावे, अशी सूचना केली आहे. तसेच, आगामी ऊस गळीत हंगामासाठी येणाऱ्या ऊसतोड मजूर, वाहन चालक यांच्यासाठीही याचा उपयोग होईल, असे या पत्रामध्ये म्हटले आहे. ज्या कारखान्यांमध्ये जागेची सोय नाही तेथे तहसिलदारांनी इमारत उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही यामध्ये केली आहे.
दरम्यान, कोरोना महामारी संकटाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. रुग्णसेवेसाठी हॉस्पिटल वाढविण्याची गरज आहे. ती गरज लक्षात घेऊन सहकारी साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल त्वरित उभारायला सांगा. साखर सचिवांना सांगून याबाबतचे परिपत्रक जारी करा, अशा सूचना शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना केल्या होत्या. कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आढावा बैठक झाली. त्या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना वरील सूचना केली.