लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिक्षकांच्या कोविड तपासणीसाठी आरटीपीसीआर चाचण्यांना शहरात सुरुवात झाली असली तरी यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी शिक्षण विभागाने नेमून दिलेल्या केंद्रांवर पोहोचल्यावर शासकीय रुग्णालयातून चाचणी करून घेऊन रिपोर्ट सादर करण्याचा मेसेज शिक्षकांना मिळाला. तर काही ठिकाणी मुंबईत राहणाऱ्या व ठाण्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी चाचणी कोणत्या केंद्रावर करावी, याबाबत अस्पष्टता असल्याचा शिक्षकांचा आराेप आहे.
राज्यात २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यासाठी सुरक्षिततेची पायरी म्हणून शिक्षकांच्या कोविड चाचण्या करून घेण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र यासाठी शाळांजवळ केंद्र नसणे, केंद्राबाबत स्पष्टता नसणे, एका महापालिका हद्दीतील चाचणीचा अहवाल दुसऱ्या महापालिका हद्दीतील कामाच्या ठिकाणी चालणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने गुरुवारी शिक्षकांचा केंद्रांवर गोंधळ उडाल्याचे चित्र हाेते. चारकोपमधील शासकीय रुग्णालय, जोगेश्वरी येथील अरविंद गंडभीर हायस्कूल, दहिसर, मुलुंड येथील मिठागर येथे शिक्षकांच्या चाचण्या गुरुवार सकाळपासून सुरू झाल्या. काही ठिकाणी त्या ४ वाजताच बंद करण्यात आल्याने शिक्षकांना दुसऱ्या दिवशी पायपीट करावी लागणार असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
‘गर्दीमुळे वाढली संसर्गाची भीती’चाचणी केंद्रावरील गर्दीमुळे संसर्गाची भीती असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक, शिक्षकांनी दिली. सर्व शिक्षकांच्या चाचण्या २ ते ३ दिवसांत होणे अशक्य आहे. अनेक शिक्षक मूळ गावी सुट्टीसाठी असल्याने शिक्षण विभागाने शाळांना १५ दिवसांचा वेळ द्यावा आणि नंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, शिक्षकांनी कोठेही केलेल्या चाचणीचा अहवाल कोणत्याही हद्दीत ग्राह्य धरावा, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली.