पुणे - सर्वसामान्यांना दूध खरेदी करण्यासाठी रविवारपासून प्रतिलीटर दोन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. कल्याणकारी दूध संघाने गाईच्या आणि म्हशीच्या दुधात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या दरांनुसार आता गाईचे दूध 48 रुपये तर म्हशीचे दूध 58 रुपये झाले आहे. राज्यातील दूध कल्याणकारी संघाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यत आला असून, त्याची अंमलबजावणी रविवारपासून होणार आहे. कल्याणकारी दूध संघाच्या पुण्यात झालेल्या बैठकीला राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के सचिव प्रकाश कुतवळ, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर यांच्यासह अन्य सदस्य आणि प्रतिनिधी उपस्थित होते. दरवर्षी हिवाळ्यात दूध उत्पादन वाढते. मात्र यावर्षी उशिरापर्यंत पडलेल्या पावसामुळे दुधाच्या उत्पादनात 10 टक्क्यांनी घट झाली आहेत. त्यामुळे अपरिहार्यपणे दुधाच्या दरात वाढ करावी लागल्याचे कल्याणकारी दूध संघाकडून सांगण्यात आले. नव्या दरांनुसार दुधाच्या दरात झालेली वाढ पुढीलप्रमाणे आहे. नव्या दरांनुसार गाईच्या दुधासाठी आता 46 रुपयांऐवजी 48 रुपये मोजावे लागणार आहेत. तर म्हशीचे दूध खरेदी करण्यासाठी 56 ऐवजी 58 रुपये मोजावे लागतील.
गाई-म्हशीचे दूध दोन रुपयांनी महागले, उद्यापासून अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 9:04 AM