सोलापूर: गाईच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयाने वाढ झाली असून, मंगळवारपासून बहुतेक दूध संघ दरवाढीची अंमलबजावणी करणार आहेत. कर्नाटकचा नंदिनी संघ मात्र पूर्वीप्रमाणेच प्रतिलिटर ४० रुपयाने दूध विक्री करणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात सध्या गाईचे दूध मागणीच्या पटीत पुरवठा होत नाही. दूध पावडरीचे दर वाढल्याने व पावडर निर्यात होऊ लागल्याने पावडरीसाठी मोठ्या प्रमाणावर दूध वापरले जात आहे. यामुळे राज्यातील ग्राहकांना पॅकिंग किंवा लूज पद्धतीने विक्रीसाठी मागणीच्या पटीत पुरवठा होऊ शकत नसल्याचे दूध संघ चालकांचे मत आहे. यामुळे गाईचा दूध खरेदी दर प्रतिलिटर २९ रुपयांपासून ३२ रुपयांपर्यंत वाढला आहे. एक डिसेंबरपासून गाईचा दूध खरेदी दर प्रतिलिटर वाढविण्यात आला आहे. काही संघ २९ रुपयाने मात्र बहुतेक संघ त्यापेक्षा अधिक दराने दूध खरेदी करीत आहेत.
दूध टंचाईमुळे खरेदी दरात वाढ झाल्याने महाराष्टÑ राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने दूध विक्री दरातही दोन रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी मंगळवार दिनांक १७ डिसेंबरपासून बहुतेक संघ करणार आहेत. सोलापूर जिल्हा सहकारी दूध (दूध पंढरी) संघ, सोनाईसह अनेक सहकारी व खासगी दूध संघांनी दूध विक्री दर प्रतिलिटर ४४ रुपयांवरुन ४६ रुपये केला आहे. एमआरपी प्रतिलिटर ४४ वरुन ४६ रुपये केल्याचे सोनाई दूध संघाच्या दशरथ माने यांनी सांगितले.
एकीकडे महाराष्टÑातील सहकारी व खासगी संघांनी विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली असली तरी कर्नाटक सरकारच्या नंदिनीचे दूध मात्र पूर्वीप्रमाणे ४० रुपयानेच विक्री होणार असल्याचे सांगण्यात आले. महाराष्टÑातील बहुतेक सहकारी व खासगी संघ ४६ रुपयाने(एमआरपी) दूध विक्री करणार असताना नंदिनी मात्र ४० रुपयाने(एमआरपी) दूध विक्री करणार असल्याचे सांगण्यात आले.
‘कर्नाटक’चे ५ रुपये अनुदान..कर्नाटकमध्ये कर्नाटक फेडरेशन नावाने राज्यभरासाठी एकच संस्था दूध संकलनाचे काम करते. संपूर्ण राज्यात ही फेडरेशन प्रतिलिटर गाईचे दूध २६ रुपये व म्हशीचे दूध ३५ रुपयाने खरेदी करते. फेडरेशनकडील दुधाला कर्नाटक सरकार प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देते. हे दूध फेडरेशनमार्फत नंदिनी या नावाने विक्री केले जाते. महाराष्टÑात सगळीकडे नंदिनी गाईचे दूध पिशवीतून प्रतिलिटर ४० रुपयाने विक्री केले जाते.
पावडर आणि बटरचे दर वाढले आहेत. ते ३१ रुपयाने दूध खरेदी करीत आहेत. आम्ही सध्या गाईचे दूध २९ रुपयाने खरेदी करीत असलो तरी आगामी काळात खरेदी दरात वाढ होईल. दूध संकलन मोठ्या प्रमाणावर घटले असून वाढण्याची शक्यता कमीच आहे.- गोपाळराव मस्केअध्यक्ष, राज्य दूध उत्पादक कल्याणकारी संघ