मोहदा (यवतमाळ) : राळेगाव तालुक्यातील खैरगाव कासार येथील शेतकऱ्याला वाघाने ठार मारल्याच्या घटनेवरून २४ तासांचा कालावधी लोटत नाही तोच पाचमोह जंगलात गुरख्याला ठार मारले. ही घटना रविवारी घडली. सखाराम टेकाम (५०) रा. झोटींगधरा (ता. पांढरकवडा) असे मृताचे नाव आहे. सायंकाळी घरी न परतल्याने सखाराम टेकाम यांचा शोध घेण्यात आला. रात्र झाल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. सोमवारी सकाळी शोध सुरू असताना गाय मृतावस्थेत आढळून आली. पुढे काही अंतरावर शोध घेतला असता सखाराम टेकाम यांच्या मृतदेहाचे लचके तोडले असल्याचे आढळून आले. राळेगाव तालुक्याच्या हद्दीत येत असलेल्या पाचमोह जंगलात मृतदेह आढळला. त्याच्या मागे पत्नी, तीन मुले व मोठा आप्त परिवार आहे. शनिवारी सायंकाळी खैरगाव कासार येथील मारोती विठोबा नागोसे या शेतकऱ्याला वाघाने ठार मारले होते. सदर परिसरात मागील काही महिन्यांपासून वाघाचा मुक्त वावर सुरू आहे. अनेक जनावरांचा फडशा त्याने पाडला. काही लोकांना या वाघाचे दर्शनही झाल्याचे सांगितल्या जाते. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
By admin | Published: September 06, 2016 4:28 AM