अंबाडी : येथील भिवाळी गावा जवळ तानसा नदीकिनारी खैराची तस्करी करणारा टेम्पो वन कर्मचाऱ्यांनी पकडल्यावर तस्करांनी त्यांच्यावर केलेल्या दगडफेकीत दोन वन कर्मचारी जखमी झाले आहेत. गणेशपुरी येथील वनक्षेत्रातील वनरक्षक सूर्यकांत कोंडीबा भोसले, जे.एच. पाटील, जे. आर भोसले व वनपाल एस.पी. साळुंखे यांना या तस्करीची माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री निंबवली, भिवाळी या परिसरात गस्त घालत असताना रात्री १२.३० च्या सुमारास तानसा नदी किनारी तस्करीचा टेम्पो पथकाला आढळून आला. वन कर्मचाऱ्यांनी टेम्पोंला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातील ३ ते ४ तस्करांनी तुफान दगडफेक सुरू केली. या हल्लयात वनपाल एस.पी. साळुंखे व वनरक्षक सूर्यकांत भोसले हे जखमी झाले. या पथकाने मोठ्या शिताफीने तस्करी करणारा टेम्पो पकडला असला तरी अंधाराचा फायदा घेऊन चारही तस्कर पळून गेले. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर चोरट्या खैर ओंडक्यांची किंमत सुमारे ९०,००० रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले. दरम्यान, या भागात लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे.
खैराचा टेम्पो पकडला
By admin | Published: May 25, 2015 3:34 AM