लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काँक्रिटीकरणाच्या साहाय्याने करण्यात येत आहे. मात्र, काँक्रिटीकरण दर्जेदारपणे करण्यात येत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते, तसेच वाहनचालकांकडून करण्यात येत आहे, तर निकृष्ट कामामुळे महामार्गाला तडे गेल्याचे निदर्शनास येत असून, याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदार कंपनीकडून अहवाल मागविला आहे. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जरी डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले असले तरी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणण्यानुसार हे काम मे २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
पळस्पे ते इंदापूरदरम्यान ८४ किलोमीटर लांबीचे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम २०११ मध्ये सुरू झाले. मात्र, १२ वर्षांचा कालावधी उलटूनही महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सद्य:स्थितीत महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. सुरुवातीला पळस्पे ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरणाचे काम डांबरीकरणाच्या माध्यमातून करण्यात येत होते. मात्र, सध्या चौपदरीकरण काँक्रिटीकरणाच्या साहाय्याने केले जात आहे. या कामाचे पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर असे दोन भाग केले आहे. त्यानुसार काँक्रिटीकरणाचे काम करताना सुमारे आठ इंच व्हाइट टॉपिंग (अस्तित्वात असलेल्या डांबरी फूटपाथला सिमेंट काँक्रीटच्या थराने झाकून) उंचीचे स्लॅब घातले आहेत.
व्हाइट टॉपिंग कार्यान्वित
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पनवेल ते कासू विभाग डिसेंबर २०२३ पर्यंत, तर कासू ते इंदापूर मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या पनवेल ते कासू विभागाचा सुमारे १७ कि.मी., तर कासू ते इंदापूर दरम्यान सुमारे १.५५० कि.मी.च्या एका लेनवर व्हाइट टॉपिंग कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे उपमहाव्यवस्थापक वाय. एन. गोतकर यांनी दिली.