मुंबई : मध्य महाराष्ट्रावर निर्माण झालेली वातावरणीय चक्राकार स्थिती आणि पश्चिम बंगलाच्या उपसागरासह अरबी समुद्रातील उल्लेखनीय हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा मारा सुरूच आहे. बुधवारी राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागत असतानाच, गेल्या २४ तासांत मुंबईत १४२.६ मिलीमीटर एवढा पाऊस पडला असून, येत्या २४ तासांसाठी शहर आणि उपनगरात पावसाचा मारा कायम राहील, असा इशारा मुंबई हवामान खात्याने दिला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीलगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम म्हणून, गेल्या २४ तासांत कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. कोकण-गोव्यात, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. वातावरणातील या उल्लेखनीय बदलामुळे २२ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल. २३ सप्टेंबर रोजी दक्षिण आणि उत्तर कोकणात अतिवृष्टी होईल. २४ सप्टेंबर रोजी दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. २५ सप्टेंबर रोजी कोकणासह गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) >वाहतुकीवर दुष्परिणामगेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांवर परिणाम झाला. पावसामुळे समोरचे काहीचदिसत नसल्याने लोकल चालवताना मोटरमनला अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे लोकलचा वेग मंदावल्याने लोकल साधारण १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही परिणाम झाला. पालघर, बोईसर येथे तर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पालघरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल तसेच गुजरातहून मुंबईला येणाऱ्या एक्स्प्रेस सेवेवरही परिणाम झाला. दुसरीकडे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वेसह अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सखल भागांत पाणी साचले होते. बेस्ट मार्ग क्रमांक २४, शीव (बस क्रमांक ७, २२, २५, ३०२ आणि ३१२) या मार्गावर पाणी साचल्याने सायंकाळी ५.३० वा. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.>मच्छीमारांना इशारा : वातावरणीय बदलामुळे २३ सप्टेंबरपर्यंत अरबी समुद्र खवळलेला राहील. या काळात समुद्रात तीन मीटर उंचीच्या लाटा उसळतील आणि वाऱ्याचा वेग ताशी ५५ किलोमीटर राहील. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान खात्याने मच्छीमारांना दिली आहे.>उपनगरांतही जोरदार बॅटिंग : दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई आणि पूर्व-पश्चिम उपनगराला पावसाने झोडपून काढले आहे. दक्षिण मुंबईत मरिन ड्राइव्ह, कुलाबा, फोर्ट, गिरगाव, तर मध्य मुंबईत लालबाग, दादर आणि वरळीसह उपनगरात वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव येथे पावसाने जोरदार हजेरी लावली.
शहरात दिवसभर कोसळधारा
By admin | Published: September 22, 2016 5:10 AM