वर्धा : चहाविक्रीवरून अनधिकृत वेंडर व पॅन्ट्री मॅनेजर यांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन चार वेंडर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३०च्या सुमारास सेवाग्राम ते चितोडादरम्यान जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये घडली. या प्रकाराचा प्रवाशांनाही चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस क्र. १२९७० ही दुपारी ३.१०च्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटली. या गाडीत लल्लासिंग, बदलुसिंग व सूरज दुबे हे तिघे नागपूर येथून प्रवास करीत होते. बुटीबोरीदरम्यान पॅन्ट्री मॅनेजर संजय सिंग यांनी तिघांसोबत चहावरून वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने संजय सिंगने आपल्या साहाय्यकांच्या मदतीने तिघांनाही जबर मारहाण केली. इतकेच नव्हेतर, त्यांना ‘पॅन्ट्री कार’मध्ये कोंडून तेथील साहित्यानेही मारहाण केली. तिघांच्याही शरीरावर चाकूसारख्या धारदार शस्त्राच्या जखमा आढळल्या. रेल्वेतील संतप्त प्रवाशांनी गाडीची चेन ओढली. बुटीबोरीपासून सुरू झालेला हा प्रकार सेवाग्रामपर्यंत सुरूच होता. सेवाग्राम लोहमार्ग पोलीस व तेथील वेंडर यांना माहिती मिळताच त्यांनी गाडी सेवाग्राम येथे थांबताच धाव घेऊन त्या तिघांना सोडविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना सोडण्यात आले नाही. कल्लूसिंग या वेंडरने पॅन्ट्रीकारच्या खिडकीला पकडून मॅनेजरला विनंती केली; पण त्यालाही गाडीसोबत पुढे फरपटत नेले; शिवाय खिडकीतून त्याच्या डोक्यावर एका वस्तूचा प्रहार केल्याने तोही जखमी होऊन खाली कोसळला. सेवाग्राम रेल्वे स्थानकावरील गोंधळ व रेल्वेतील प्रवाशांची आरडाओरड ऐकून अखेर सेवाग्राम ते चितोडादरम्यान गाडी थांबवून लोहमार्ग पोलिसांनी जखमींची सुटका केली. चौघांनाही उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेले चौघेही अनधिकृत वेंडर असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्रवाशांना अकारण मनस्तापसेवाग्राम रेल्वेस्थानकावर एरवी दोन मिनिटे थांबणारी जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस सेवाग्राम ते चितोडा दरम्यान तासभर थांबली. पुढेही हिंगणघाट येथे तासभर थांबविण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये हाणामारी
By admin | Published: January 01, 2016 1:35 AM