पुणे : काेराेनाचा प्रादुर्भाव भारतात आता हळूहळू वाढताना दिसत आहे. कर्नाटक आणि पंजाब या दाेन राज्यांमध्ये काेराेनाचे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे, तर पुण्यात काेराेनाचे दाेन रुग्ण आढळल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे आता सर्वत्रच खबदारी घेण्यात येत आहे. या काेराेनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून शाळांना विद्यार्थ्यांना काेराेना राेगाबाबत आणि त्यापासून कसे संरक्षण करावे यासाठी मार्गदर्शन करण्याबाबत सांगण्यात आले आहे.
दुबईवरुन आलेल्या पुण्यातील दांपत्याला काेराेना राेगाची लागण झाल्याचे समाेर आले आहे. पुण्यातील एनआयव्हीने त्यांचे नमुने पाॅझिटिव्ह असल्याचे रिपाेर्ट्स दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही आता काेराेनाचा शिरकाव झाल्याचे समाेर आले आहे. राज्य सरकार तसेच पुणे जिल्हा प्रशासनकडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचबराेबर आता राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांमध्ये काेराेनाबाबत जागृती व्हावी यासाठई पाऊले उचलली जात आहेत.
राज्याच्या शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले असून यात विद्यार्थ्यांना काेराेनाबाबत मार्गदर्शन करताना कुठल्या सुचना देणे आवश्यक आहे याचा समावेश करण्यात आला आहे. नाेव्हेल काेराेना विषाणूचा प्रसार राेखण्यासाठी सर्वसामान्य जनता तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण हाेणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये वारंवार हात धुणे, शिंकताना, खाेकताना रुमालाचा वापर करणे, टिशु पेपरचा वापर करणे, आजारी असताना शाळेत येण्याचे टाळणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, वारंवार ताेंड, डाेळे व नाक यांना हात न लावणे. आजारी व्यक्तीपासून दूर रहावे, गरज असल्यास त्वरीत नजीकच्या स्वास्थ केंद्रास भेट देणे आदी बाबी काेराेना राेखण्यासाठी उपयुक्त आहेत. याबाबत माहिती असणारा युवा वर्ग त्यांचे कुटुंबामध्ये, समाजामध्ये व त्या पलीकडेही जागरुकता निर्माण करु शकताे. असे या परिपत्रकात म्हंटले आहे. तसेच सद्यःस्थितीला विद्यार्थ्यांना शाळेत येताना मास्कची सक्ती करण्यात येऊ नये असेही यात सांगण्यात आले आहे.