लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. 17 - भारतीय रेल्वेची आधुनिक ओळख बनत असलेल्या मुंबई-करमाळी तेजस एक्सप्रेससाठी नवीन इंजिन सज्ज करण्यात आले आहे. नव्या इंजिनची रंगरंगोटी देखील तेजस एक्सप्रेसशी साधर्म्य साधणारी आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेचे मुखवटा बनलेल्या पारंपरिक इंजिन रंगसंगतीला छेद देण्याचा प्रयत्न तेजसच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
ताशी २०० किमी धावण्याची क्षमता असलेली मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस प्रत्यक्ष मार्गावर सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. यंदा आकर्षक रंगसंगतीने नव्या दमदार इंजिनमुळे तेजस पुन्हा एकदा चर्चेत आहे. सद्यस्थितीत मध्य रेल्वेचे साधे इंजिन तेजस एक्सप्रेसला जोडण्यात आले आहे. रंगसंगती जुळत नसल्याकारणामुळे नवे इंजिन जोडण्याचा निर्णय मरेच्या वतीने घेण्यात आला. त्यानूसार मध्य रेल्वेवर हालचालींना वेग आला. दक्षिण रेल्वेवरील इंजिन मरेच्या ताफ्यात दाखल झाले.
कल्याण लोको शेडमध्ये या इंजिनसाठी विशेष टिम तयार करण्यात आली. हलक्या लाल आणि पिवळसर रंगाने हे इंजिन रंगवण्यात आले आहे. तर इंजिनच्या अग्रभागातील सुर्यामध्ये राष्ट्रध्वज रेखाटण्यात आला आहे. ताशी १६० किमी धावण्याची क्षमता या इंजिनची आहे. सोमवारी हे नवीन रेल्वे इंजिन तेजस एक्सप्रेसला जोडण्यात येणार असल्याची शक्यता मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाºयांनी वर्तवली आहे.
नव्या इंजिनची वैशिष्ट्ये
रंग : सुर्याच्या मध्यभागी राष्ट्रध्वज, सुर्योदयाच्या किरणांच्या हलक्या लाल आणि पिवळसर रंगाच्या छटा
लोको नंबर : १५५१६ डब्ल्यू डीपी ३ ए
वैशिष्ट्ये : ३१०० बीएचपी, १६ सिलेंडर, ४ स्ट्रोक टर्बो सुपर चार्ज डिझेल इंजिन
ट्रान्समिशन : एसी-डीसी ट्रान्समिशन
वेग : १६० किमी प्रतितास
कल्याण डिझेल लोकोशेड मधील कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांनी या इंजिनाचे उत्तम डिझाइन केले आहे. आता तेजसच्या डब्यांच्या रंगसंगती प्रमाणे इंजिनाचा रंग करण्यात आला आहे.
- ए.के.सिंग, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे