अजित मांडके,
ठाणे- युती नको, स्वबळच हवे अशी जाहीर अपेक्षा व्यक्त करून नंतर युतीच्या चर्चेला बसलेल्या भाजपाच्या नेत्यांनी ६७ जागांचा दावा दाखल केल्याने शिवसेनेनेही आपला युतीचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. भाजपाला ४५ आणि रिपाइंना पाच असा ५० जागा सोडून वाटाघाटीत आपणच मोठा भाऊ असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी व्हावी म्हणून काही बाबींवर मतैक्य व्यक्त केले असताना युतीतील चर्चा, वाटाघाटी होऊन तिढा सुटेल की नाही याबाबत साशंकता होती. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीवेळी युती नको-स्वबळ हवे अशी निनावी फलकबाजी करून भाजपाच्या नेत्यांनी आपला दबाव दाखवून दिला होता. त्यानंतर शिवसेनेनेही आम्ही स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे प्रत्त्युत्तर दिले होते. स्वबळाच इशारे दिल्यानंतरही युती तुटल्याचे खापर डोक्यावर घेण्यास कोणीच तयार नसल्याने वाटाघाटी सुरू होण्यावाचून दोन्ही पक्षांपुढे पर्याय नव्हता. त्याची पार्श्वभूमी तयार करताना भाजपाने ६७ जागांची अपेक्षा व्यक्त करत समान संधीचे सूत्र मांडले. मात्र त्याला अपे७ेप्रमाणे धोबीपछाड देत शिवसेनेने भाजपाला जास्तीत जास्त ४५ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. युतीतील तिसरा वाटेकरी असलेल्या रिपाइंना पाच जागा सोडू शकतो, असेही त्या पक्षाच्या नेत्यांनी सुचवले आहे.या फॉर्म्युलानुसार मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला दुप्पट जागा देण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे. रिपाइंसाठी पाच जागा राखून ठेवणे म्हणजे पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा देण्यास तयार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. ठाण्याचा गड राखण्यासाठी शिवसेनेची जोमाने तयारी सुरू आहे. भाजपाने मैत्रीचा हात पुढे केला असला, तरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशी आडून पारदर्शक कारभाराचा मुद्दा तो पक्ष पुढे आणेल याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. युती करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यायचा असल्याने भाजपाच्या शहर कार्यकारिणीने विधानसभेच्या गणितांवर आधारित ६७ जागांवर दावा केला आहे. त्यात शिवसेनेच्या बालेकिल्यातील अनेक जागांचाही समावेश आहे. दुसरीकडे रिपाइं (आठवले) गटानेही २० जागांची मागणी दोन्ही पक्षाकडे केली आहे. युतीतील जागावाटपाचा पहिला फॉर्म्युला शिवसेनेने पुढे आणला आहे. तो सध्या जरी कागदावर असला तरी शिवसेनेच्या नेत्यांचे त्यावर एकमत झाल्याचे बोलले जाते. शिवसेना भाजपाला जरी दुप्पट जागा देत असली, तरी भाजपा नेत्यांचे त्यावर समाधान होण्याची चिन्हे नाहीत. ते ६७ जागांवर आणि त्यातही विशिष्ट प्रभागांवर ठाम असल्याने तेथेच युतीला पहिली ठेच लागण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत रिपाइंना १० जागा दिल्या होत्या. त्यातील दोन जागा ऐनवेळी शिवसेनेच्या तिकीटावर लढविण्यात आल्या. त्यातील चार जागांवर रिपाइंना यश मिळाले. त्यामुळे त्यांनी कोटा वाढवून मागितला आहे. ती मागणी मान्य करायची असेल तर भाजपाच्या जागा कमी कराव्या लागतील, असे सेना नेत्यांचे म्हणणे असल्याने भाजपा आणि रिपाइंत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी हा फॉर्म्युला स्वीकारला जातो का, यावरच पुढील वाटाघाटी अवलंबून आहेत. >दिवा आणि मुंब्य्रात फिफ्टी-फिफ्टीशिवसेना १३१ पैकी ८१ जागांवर लढणार आहे. उर्वरित जागांपैकी ४५ जागा भाजपाला आणि ५ जागा रिपाइं आठवले गटाला देण्याची सनेनेची तयारी आहे. हा फॉर्म्युला तयार करतांना शिवसेनेने आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. बालेकिल्ल्यात जेथे भाजपाचे नगरसेवक होते, त्या जागा त्यांच्यासाठी सोडल्या जातील. वागळे, कोपरीत ज्यांनी भाजपात प्रवेश केला आहे, तेथे त्यांच्यासाठी जागा सोडण्यास शिवसेना तयार असल्याचे बोलले जाते. याशिवाय दिव्यात ५० - ५० टक्के जागांवर लढती, घोडबंदर भागात काही जागा, कळव्यात चार-पाच ठिकाणी, मुंब्य्रात ५०-५० टक्के असा काहीसा फार्म्युला तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली.