मुंबई : मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सांकेतिक भाषातज्ज्ञांची आवश्यकता असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अभ्यासक्रम तयार करण्यात यावा. तसेच कर्ण व मूकबधिरांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण, रोजगार संधीची उपलब्धता व कौशल्य विकासावर भर देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.राज्यस्तरीय कर्णबधिर संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, संघटनेचे अध्यक्ष मनोज पटवारी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शाळेमध्येही प्रवेश घेता यावा, यासाठी राज्य शासनामार्फत अशा शाळांमध्येही पायाभूत सुविधा पुरविण्यात येतील. या शाळांमध्ये सांकेतिक भाषातज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी. कर्ण ब मूकबधिर विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी शासकीय विद्यालय सुरू करण्यासंदर्भातील आराखडा सादर करावा. तसेच शालेय अभ्यासक्रमामध्ये चौथी भाषा म्हणून सांकेतिक भाषेच्या समावेशासंदर्भात विचार करण्यात येईल, असे सांगितले. मूकबधिरांच्या शासकीय नोकरीतील समावेशासाठी उच्च शिक्षणाची अट रद्द करण्याचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन देतानाच अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले. राज्यात बनावट प्रमाणपत्र धारकांविरुद्ध कठोर कारवाई करावी; तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करून अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिल्या. (प्रतिनिधी)
सांकेतिक भाषातज्ज्ञांचा अभ्यासक्रम तयार करावा
By admin | Published: April 11, 2017 3:12 AM