कोल्हापूर /सांगली : जगातील सर्वांत प्राचीन जैन धर्माने अहिंसा, प्रेम, शांतीचा संदेश दिला आहे. भगवान बाहुबलींसह २४ तीर्थंकरांनी दाखविलेल्या अहिंसा, त्यागाच्या मार्गावरूनच शांती, सौहार्दपूर्ण विश्वाची निर्मिती होण्यास प्रेरणा मिळेल, असा आशावाद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी व्यक्त केला.श्रवणबेळगोळ येथे सुरू असलेल्या गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवात शनिवारी तपकल्याणकचे विधी झाले. त्याअंतर्गत राज्याभिषेक सोहळ्याचे उद््घाटन उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. नायडू यांच्या हस्ते भगवान आदिनाथ यांच्या मूर्तीवर रत्नकिरीट चढवून मोत्यांनी अभिषेक घालण्यात आला. यावेळी राज्यपाल वजूभाई वाला, केंद्रीय संसदीय व्यवहारमंत्री अनंतकुमार, कर्नाटकचे मंत्री ए. मंजू, भट्टारक पट्टाचार्य चारुकीर्ती स्वामीजी, महोत्सव समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सरिता जैन, सचिव सुरेश पाटील, आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज, त्यागीगण, आदी उपस्थित होते.नायडू म्हणाले, धर्म, संस्कृती हा देशाचा मुख्य पाया आहे. जैन धर्माने जगाला अहिंसेचा संदेश दिला. महात्मा गांधींनीही २४ तीर्थंकरांच्या संदेशापासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्याचा लढा अहिंसेच्या मार्गाने लढला. सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक आचार या त्रिसूत्रीवर जैन धर्माचा विश्वास आहे. श्रद्धा, ज्ञान, मानवता, यातूनच शांती व सौहार्दपूर्ण विश्व निर्माण होण्यास प्रेरणा मिळणार आहे.यावेळी आचार्य वर्धमानसागर महाराज, आचार्य पुष्पदंत सागर महाराज यांचे प्रवचन झाले. सकाळी पंचकल्याणकमध्ये संस्कार मंडप आणि चामुंडराय मंडपामध्ये दिवसभर तपकल्याणकचे विधी झाले.बिहारमध्ये प्राकृत विद्यापीठ - अनंतकुमारश्रवणबेळगोळ येथे प्राकृत विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. त्याच धर्तीवर भगवान महावीर यांचे जन्मस्थळ असलेल्या बिहारमधील वैशाली येथे प्राकृत विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी दिली.ही दोन्ही विद्यापीठे जैन तत्त्वज्ञानाचा प्रसार व प्रचारात दीपस्तंभासारखे काम करतील, असेही ते म्हणाले१0८ ग्रंथांचे प्रकाशनउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते भारतीय जैन पीठाच्या माध्यमातून तयार केलेल्या १0८ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नायडू यांनी काही ग्रंथ नजरेखालून घातले आणि चारुकीर्ती स्वामीजी यांच्याशी चर्चा केली.
भगवान बाहुबलींच्या संदेशातून सौहार्दपूर्ण विश्वाची निर्मिती - व्यंकय्या नायडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 2:20 AM