मुंबई : मुंबईमध्ये एसआरए आणि म्हाडाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. मात्र, त्यांच्यात योग्य समन्वय राहावा, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात समन्वय कक्ष स्थापणार आहे. येथे दर महिन्याला सचिवस्तरावर आढावा बैठक घेण्यात येईल, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत मंगळवारी दिली.
आ. मनीषा कायंदे यांनी बोरिवली येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण न करणाऱ्या विकासकाविरुद्ध कारवाई करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. जे विकास प्रकल्प पूर्ण न करता फसवणूक करतील, विकासकांना काळ्या यादीत टाकले जाईल, असे त्यांनी सांगितले.
बोरिवलीच्या एक्सर गाव परिसरातील भूखंड क्र. १७९ येथे श्रीनिवास डेव्हलपर्सने बोरेभाट सहकारी गृहनिर्माण झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ४८० पात्र झोपडपट्टीधारकांपैकी २१३ पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन अद्याप केले नाही. विकासकाने पुनर्वसन न करता आधी विक्री घटक इमारतीचे बांधकाम केल्याबद्दल त्याच्याविरोधात झो. पु. प्राधिकरणाने बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.