अकोला - वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्याच्या प्रचारार्थ ग्रामजयंती पर्वानिमित्त अकोल्यात साहित्यालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन समितीचा हा उपक्रम आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रचार, तरुणांना राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अभ्यास करण्यास मदत होईल आणि आदर्श समाज निर्मिती करण्याच्या उद्देशाने हे साहित्यालय निर्माण करण्यात येणार आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा प्रचार व्हावा, त्यांचा मुख्य उद्देश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून मोठा वाचकवर्ग निर्माण करण्यासाठी हे साहित्यालय निर्माण करण्यात येणार आहे. लोकसहभागातून निर्माण करण्यात येणार असलेल्या या साहित्यालयामध्ये हजारो पुस्तके राहणार असून, राष्ट्रसंतांचे सर्वच प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साहित्यालयाकडे प्रत्येकाचा कल वाढावा, यासाठी जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, खासगी कार्यालयात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्याची जागृती तरुणांमधून मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, हे साहित्य खेड्यापाड्यात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. एका वर्षाच्या कालावधीत हजारो पुस्तके व विविध साहित्य यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचा मानस राष्ट्रसंत साहित्य संमेलन समितीचा आहे. या साहित्यालयाच्या निर्मितीसाठी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, हभप आमले महाराज, हभप प्रा. गहुकर महाराज, तिमांडे महाराज, सुधाताई जवंजाळ, सत्यपाल महाराज, संदीपपाल महाराज, डॉ. संतोष हुशे, सारंग खोडके, रामदास काळे, भाऊराव राऊत, राष्ट्रसंत साहित्य संमेलन समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. यासाठी डाबकी रोड, मोठी उमरी, लहान उमरी, श्री गुरुदेव सेवा मंडळ चांदूर, कान्हेरी सरप, म्हैसपूर, उगवा, व्याळा, वाडेगाव, भरतपूर, खडकी, बाभूळगाव येथील गुरु देव सेवा मंडळातील कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत.
अकोल्यात होणार राष्ट्रसंतांच्या साहित्यालयाची निर्मिती
By admin | Published: May 14, 2014 8:20 PM