कोल्हापूर : देशभरातील विविध विद्यापीठांतून आलेल्या युवा पिढीने आपल्या सर्जनशीलतेची छाप ‘शिवोत्सवा’त पाडली. यावेळी पोस्टर मेकिं ग, शास्त्रीय सूरवादन, पाश्चिमात्य गायन, कोलाज, एकांकिका, आदी कलाप्रकारांच्या सादरीकरणातून त्यांनी शनिवारी आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्राची सुरुवात प्रश्नमंजूषेने झाली. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील निलांबरी सभागृहात झालेल्या या स्पर्धेत देशभरातील तरुणाईने आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखविली. तसेच इलोक्युशन स्पर्धेतही ‘स्वच्छ भारत’ या विषयावर विचार मांडले. याच वेळी संगीत व नाट्यशास्त्र विभागात शास्त्रीय सूरवादन स्पर्धा रंगली होती. सकाळच्या प्रसन्न वातावरणात सूरमयी सुरावटीत गायक-कलाकारांनी बासरी, सारंगी, व्हायोलीन, इसराज या वाद्यांच्या माध्यमातून देस, जोग, टोळी असे विविध राग सादर केले; तर मानव्यशास्त्र इमारतीत कुंचल्याच्या साहाय्याने स्वच्छ भारत, सेव्ह अर्थ, निसर्गाशी मैत्री, मानवापेक्षा पृथ्वी श्रेष्ठ असे संदेश पोस्टर मेकिंंगमधून दिले. भारतीय संगीताबरोबरच पाश्चिमात्य संगीतावर आमचे तितकेच प्रेम आहे, असे सांगत विविध ग्रुप्सनी बहारदार गीतांचे सादरीकरण केले. लोककला केंद्रात रंगलेल्या या स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक अशा स्वरूपांतील या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी विविध महाविद्यालयांतील तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. याच वेळी वि. स. खांडेकर भाषाभवनमध्ये एकांकिका स्पर्धा रंगल्या. त्यामध्ये वर्तमान सामाजिक, राजकीय वास्तवावर भाष्य करणाऱ्या आठ एकांकिका सादर करण्यात आल्या; तर मानव्यशास्त्र विभागात कोलाज स्पर्धेत आपल्या कल्पकतेतून विविध कल्पना रंगीबेरंगी कागदांच्या साहाय्याने निर्माण केल्या.एकांकिकेतून चार्ली चाप्लीनचा जीवनपट आपली दु:खे लपवून जगाला हसविणाऱ्या चार्ली चाप्लीनच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या ‘चार्ली चाप्लीन’ या चंदीगढ विद्यापीठाच्या कलाकारांनी सादर केलेल्या एकांकिकेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
महोत्सवावर युवा पिढीच्या सर्जनशीलतेची छाप
By admin | Published: February 12, 2017 12:28 AM