समीर कर्णुक,
मुंबई- तब्बल चार तास रिक्षात बेवारस पडलेल्या वृद्धाच्या मृतदेहाला कोणी हात लावायला तयार नसताना एका तरुणाने पुढाकार घेऊन मृतदेह रुग्णालयात नेऊन कायदेशीर बाब पूर्ण केल्यानंतर त्याच्यावर स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले आणि स्वत: त्याला अग्नीही दिला. चेंबूरच्या घाटला गावात राहणाऱ्या राजेंद्र नगराळे या तरुणाच्या कार्यामुळे आजही समाजात माणुसकी शिल्लक असल्याचे दिसून आले. हरेश साटम (६०) असे वृद्धाचे नाव असून ते चेंबूरच्या सुभाषनगर परिसरात पत्नी आणि आईसोबत राहायचे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीने त्यांना आणि त्यांच्या आई प्रभावती (८५) या दोघांना घराबाहेर काढले. काहीही कामधंदा नसल्याने दोघे मायलेक चेंबूर परिसरात भीक मागून दिवस काढत होते. त्यानंतर मिळेल त्या जागी ते झोपत असत. गेल्या काही दिवसांपासून ते घाटला गाव परिसरातील सावळी नाका येथील फुटपाथवर राहत होते. या ठिकाणी पार्क केलेल्या रिक्षात पावसामुळे ते आश्रय घ्यायचे. गेल्या तीन-चार दिवसांपासून हरेश यांची प्रकृती बिघडली होती. पैसेदेखील नसल्याने ते रुग्णालयातही जाऊ शकत नव्हते. त्यातच त्यांचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या आईने आरडाओरडा केल्यानं परिसरातील रहिवासी जमा झाले; मात्र कोणीही मदत करायला तयार नव्हते. सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत मृतदेह रिक्षामध्ये पडून होता. ही घटना घाटला गाव परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र नगराळे यांना कळताच त्यांनी हा मृतदेह रिक्षातून गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेला. तेथे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या मृतदेहावर देवनार स्मशानभूमीत स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले.