पुणे : पालकांनी मुलांवर लादलेले अतिनिर्बंधदेखील धाेकादायक ठरू शकतात, याचा प्रत्यय एरंडवणा येथे एका व्यावसायिकाला आला. खात्यातून हजार, दाेन हजार नाही तर तब्बल अडीच लाख रुपये कमी दिसू लागल्याने त्यांनी तपास केला असता, आपल्या २४ वर्षीय मुलाला एका मुलीने ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याचा प्रकार समाेर आला.
एरंडवणा येथे राहणाऱ्या व्यावसायिकाने आपल्या मुलाने कोणत्याही मुलीबरोबर मैत्री करू नये असे निर्बंध लादले हाेते. त्यांना गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हा प्रकारच आवडत नसे. याचे दडपण मुलावर हाेते. ताे नाेकरी करू लागला तरी या निर्बंधाचे ओझे वाहत हाेता. याचाच गैरफायदा एका तरुणीने उचलला. आधी मित्र म्हणून संवाद सुरू केला आणि प्रत्यक्ष भेटायची वेळ आली तेव्हा ती मुलगी निघाली. तिने व्हॉट्सॲपवर केलेले चॅट वडिलांना दाखविण्याची धमकी देत तब्बल अडीच लाख रुपये त्याच्याकडून उकळले. याप्रकरणी ४८ वर्षीय व्यावसायिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, प्रीतेश सोंडकर नावाच्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महाविद्यालयीन मुलाच्या खात्यातून गुगल पे द्वारे १ लाख ५२ हजार रुपये आणि प्रत्येकी २५ हजार असे चार वेगवेगळ्या क्रमांकावर रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलाला विचारल्यावर प्रकरणाचे बिंग फुटले.