अलिबाग : पोलादपूर तालुक्यातील कामथे-बोरघर फौजदारवाडीतील लक्ष्मी अर्जुन गोगावले यांना १५ सप्टेंबर २०१३पासून गावातील आणि भावकीतील लोकांनी वाळीत टाकले आहे. लक्ष्मी यांनी महाडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या अर्जावर सुनावणी झाली असून न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलादपूर पोलिसांनी शनिवारी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत गोगावले, शंकर गोगावले, मारुती गोगावले, सुनीता गोगावले, मारुती गोगावले, गणपत गोगावले, दगडू गोगावले, लखू गोगावले, चंद्रकांत गोगावले, संतोष गोगावले, नामदेव गोगावले यांचा त्यात समावेश आहे.हे सर्व जण भावकीतील आहेत. शंकर गोगावले यांची मुलगी आणि लक्ष्मी गोगावले यांचा मुलगा यांचे प्रेमसंबंध होते. ही गोष्ट शंकर गोगावले यांच्या पसंत नव्हते. त्यामुळे लक्ष्मी गोगावले यांनी या त्या दोघांना समजावून प्रेमप्रकरणावर पडदा टाकला. शंकर गोगावले यांची मुलगी ७ जून २०१३ला घर सोडून निघून गेली. ही बाब शंकर गोगावले यांनी चंद्रकांत गोगावले यांना कळविल्यानंतर त्यांनी भावकीतील ११ जणांनी बैठक घेतली आणि मुलगी घरी येईपर्यंत लक्ष्मीच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचा तसेच फौजदारवाडी गावातही त्यांच्यावर बंदी आणण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. याव्यतिरिक्त लक्ष्मी गोगावले यांच्या कुटुंबाला २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. लक्ष्मी यांचा मुलगा गणेश याने त्या मुलीसोबत २०११पासून प्रेमसंबंध तोडले असल्याने वाळीत टाकू नका, तसेच दंड ठोठावू नका, अशी विनंती केली. मात्र कोणीही गणेशचे काहीही ऐकून घेतले नाही. शिवाय गावकऱ्यांवरही दबाव आणला. (विशेष प्रतिनिधी)
वाळीत टाकणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: March 09, 2015 1:57 AM