पुणे : महंमदवाडी येथील जमीन बळकाविल्याप्रकरणी दीपक ऊर्फ बाबा मिसाळ यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा हे राजकीय षड्यंत्र असल्याचे भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. कोंढवा पोलीस ठाण्यात बाबा मिसाळ यांच्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अमजद युसूफ बडगुजर यांनी फिर्याद दिली आहे. बडगुजर व त्यांचे तीन भाऊ यांनी डिसेंबर २०१४ मध्ये महंमदवाडी येथे सर्व्हे क्रमांक ९६/२/२६/१ येथील ३ हजर ७०६ चौरस मीटर जमीन खरेदी केली आहे. या जागेवर १८ एप्रिल रोजी बाबा मिसाळ यांनी कब्जा करून त्याठिकाणी मिसाळ प्रॉपर्टीजचा बोर्ड लावला. मिसाळ यांनी तारेचे कुंपण, सुरक्षारक्षकाच्या खोलीची तोडफोड करून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान केले. मिसाळ यांनी बेकायदेशीरपणे जमिनीवर कब्जा केला, अशी फिर्याद बडगुजर यांनी दिली आहे. आमदार मिसाळ म्हणाल्या, मी व माझे दीर दीपक मिसाळ अनेक वर्षे पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहोत. या क्षेत्रात आमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी व आमची समाजातील प्रतिमा मलीन करण्यासाठी हे कारस्थान रचण्यात आले आहे. संबंधित जागेसंदर्भात आमच्याकडे असलेल्या कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा करण्याची संधी दीपक मिसाळ यांना न देता, त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. ही बाब अन्यायकारक आहे. या संदर्भात गुरुवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना याबाबत बाजू मांडण्याची संधी देण्याची विनंती केली. त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदारांवर फसवणुकीसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बाबा मिसाळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याचे माधुरी मिसाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बाबा मिसाळ यांच्यावरील गुन्हा हे राजकीय षड्यंत्र
By admin | Published: April 29, 2016 1:03 AM