मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जळगावमधील नगरसेवक ललित कोल्हे याच्याविरुद्ध पत्नीचा मानसिक छळ, तसेच फसवणूक केल्याच्या आरोपांवरून जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पत्नी भक्ती उर्फ रुबी यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित कोल्हेसोबत १२ एप्रिल २00४ रोजी मीरारोड येथे नोंदणी पद्धतीने आपला विवाह झाला. त्यानंतर जळगाव येथे सासरी गेल्यावर ललितचे त्यापूर्वी दोन विवाह झाले असून, त्यांना मुलेही असल्याचे समजले. ललित यांची पहिली पत्नी हर्षल हिने आत्महत्या केली होती आणि त्या प्रकरणी त्यांना अटक होऊन निर्दोष सुटका झाली होती, असे भक्ती कोल्हे यांनी म्हटले आहे.त्यानंतर आपण जळगाव येथील घर सोडून जावे, यासाठी कोल्हे कुटुंबीयांनी आपला मानसिक छळ सुरू केला. त्याचबरोबर मारहाणही केली जात असल्याचे भक्ती यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पती ललित कोल्हेसोबत सासरा विजय, सासू सिंधू, नणंद वंदना चौधरी, काजल आणि ललितची प्रेयसी सुकन्या भट्टाचार्य हिच्याविरुद्धही भा.दं.वि. ४९८ (अ), ४२0, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाबाबत भक्ती यांनी यापूर्वीही पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने, त्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयाने रामानंदनगर पोलिसांमार्फत ललित कोल्हेसह ११ जणांविरुद्ध समन्स जारी केले होते. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी या प्रकरणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितल्यानंतर त्याची दखल घेतली जाऊन जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
पत्नीच्या छळप्रकरणी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
By admin | Published: February 01, 2016 2:40 AM