अकोला : विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांचे वडील रामकृष्ण मिटकरी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याच शेतात अंत्यसंस्कार केल्यानंतर या ठिकाणी बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या चबुतऱ्यावर विठ्ठलाची मूर्ती उभी केल्याने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या, अशी तक्रार करण्यात आली. या प्रकरणात अकाेट न्यायालयाच्या आदेशावरून आमदार अमाेल मिटकरी यांच्याविरुद्ध दहीहंडा पाेलिस ठाण्यात ९ ऑक्टाेबर राेजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तक्रारकर्ते तथा माजी जिल्हा परिषदेेचे माजी समाजकल्याण सभापती, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजयसिंह साेळंके यांनी मंगळवारी येथे आयाेजित पत्रकार परिषदेत दिली़
अकोट तालुक्यातील कुटासा येथील आमदार अमोल मिटकरी यांचे वडील रामकृष्ण मिटकरी यांचे २७ सप्टेंबर २०१८ ला निधन झाले हाेते. त्यानंतर अमाेल मिटकरी यांनी वडिलांवर त्यांच्याच शेतात अंत्यसंस्कार केले़ या दरम्यान, त्यांनी कुणाचीही परवानगी न घेता सिमेंटचा चाैथरा बांधला़ या चाैथऱ्यावरच विठ्ठलाची मूर्ती उभी केली़ या प्रकारामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याने भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजयसिंह साेळंके यांनी दहीहंडा पाेलिस ठाण्यात तक्रार दिली़ मात्र पाेलिसांनी कारवाई केली नाही़ त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल केली़ यावरून न्यायालयाने आमदार अमाेल रामकृष्ण मिटकरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला़ यावरून दहीहंडा पाेलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम २९५ व २९५ अ म्हणजेच हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आता मिटकरी यांना पाेलिसानी तातडीने अटक करावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजयसिंह साेळंके यांनी पत्रकार परिषदेत केली़
पाेलिसांवर राजकीय दबाव
अमाेेल मिटकरी यांच्याविरुद्ध दहीहंडा पाेलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्यावेळच्या पाेलिस निरीक्षकांनी दखल घेत गुन्हा नाेंद केला हाेता़ त्यामुळे संतापलेल्या मिटकरी यांनी वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत एका रात्रीतच पाेलीस निरीक्षक यांची बदली केली़ त्यानंतर त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना या ठाण्यात आणण्यात आले असून तेव्हापासून मिटकरी यांच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याचा आराेप साेळंके यांनी केला़
मिटकरी यांची कारकीर्दच वादग्रस्त
आमदार अमाेल मिटकरी हे किराणा दुकान चालवत हाेते़ या दरम्यान शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्यास त्यांनी सुरुवात केली़ हे व्याख्यान देताना दाेन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे़ ब्राह्मण समाजाच्या भावना दुखविणारे वादग्रस्त वक्तव्य मिटकरी नेहमीच करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात़ त्यांना आमदारकी मिळाल्याने अहंकार आला असून यावर पवार साहेबांनीच त्यांना कानपिचक्या देण्याची गरज असल्याचे साेळंके यांनी यावेळी सांगितले.