पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात कांदाफेक आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आले होते. जालिंदर कामठे, महिला जिल्हाध्यक्षा लोचन शिवले, गणपत महादेव कड, शांताराम बापू कटके, दिलीप वाल्हेकर, गणेश महाडिक, राहुल शेवाळे, भरत लक्ष्मण कुंजीर, माणसिंग भय्या पाचुलकर, बाळासाहेब भोसले, राजेंद्र चौधरी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार परशुराम लांडगे यांनी फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या वेळी कांद्याच्या गोण्या जमिनीवर टाकून, घोषणाबाजी करीत कांदाफेक आंदोलन करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक डी. एन. ढोले पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
कांदाफेकप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: September 22, 2016 1:50 AM