ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ९ - फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणा-यांसोबतच तो मजकूर लाईक व शेअर करणा-यांवरही गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिला आहे. तर वॉट्स अॅपवर आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड करणा-यांवरही पोलिस गुन्हा दाखल करतील असे पाटील यांनी म्हटले आहे.
फेसबुकवर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने गेले काही दिवस राज्यभरात तणावाची स्थिती निर्माण झाली होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्याचे गृहमंत्री आर.आऱ. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सोशल नेटवर्किंग साईट्चा गैरवापर करणा-यांना सावधानतेचा इशाराच दिला आहे. पुण्यातील मोहसिन शेख या इंजिनिअर तरुणाच्या मृत्यूविषयी पाटील म्हणाले, मोहसिनचा या आक्षेपार्ह फोटोप्रकरणाशी काडीमात्र संबंध नव्हता.
हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले. कठोर नियमांमुळे एखाद्या संघटनेवर लगेच बंदी घालता येत नाही. मात्र हिंदू राष्ट्र सेनेने यापूर्वीही तेढ निर्माण करणारी पत्रकं वाटल्याची माहिती हाती आली आहे. पोलिस या संघटनेविरोधात पुरावे गोळा करत असून यानंतरच हिंदू राष्ट्र सेना व त्या संघटनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्यावर बंदीची कारवाई करणे शक्य असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.